Monday, December 30, 2013

“नारो म्हणे आता निरोपाचे बोलू...!!!! ”“२०१३ संपलं???? नारो म्हणे आता निरोपाचे बोलू” असं म्हणत ते परतीच्या उंब-याशी उभं आहे.. अन माझा हात निरोपाकरता उचलत नाहिये.... कारण या वर्षानं खरंच भरभरुन दिलं...

या वर्षभरात माझे बालकपालक(BP), नारबाची वाडी, झपाटलेला २, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, धामधूम, थोडं तुझं थोडं माझं, मंगलाष्टक वन्स मोअर, अंगारकी असे काही सिनेमे पडद्यावर आले. त्यातही “नारबाची वाडी” या मी पटकथा, संवाद आणि गीतलेखन केलेल्या सिनेमाला रसिकांनी आणि समीक्षकांनी दिलेली दाद खरंच अविस्मरणीय आहे. साधा सोपा विषय आणि सोप्पी पण काहीतरी बोध देणारी गोष्ट तुमच्याकडे सांगण्याची हातोटी असेल तर रसिकांना आजही ऐकायला आवडते हे या सिनेमानं मला सांगितलं. तसंच अनेक वर्षे चित्रपटांकरता गीतलेखन करताना गाण्यात सुरेख काव्य असावं, हळुवार अस्सल मराठमोळे शब्द यावेत अन मग त्या काव्याचं गीत व्हावं ही इच्छा “मंगलाष्ट्क वन्स मोअर” ने पुर्ण केली आणि आजची तरुणाई भावगीताच्या अंगाने जाणारी हळूवार शब्दप्रधान गाणी स्वीकारणार नाहीत हा इथल्या मंडळीचा समज खोटा ठरला. उत्तम भाषेवर आणि शब्दांच्या श्रीमंतीवर प्रेम करणारा प्रेक्षक शिल्लक आहे याची ग्वाही या दोन सिनेमांनी मला दिली. माझा आत्मविश्वास दुणावला...

’गीतकार’ म्हणून पुरस्कार सदैव मिळतातच पण ’कवी’ म्हणून या वर्षी साहित्य क्षेत्रातून मिळालेली दाद मोलाची होती.

या वर्षी साहित्य परिषदेकडून गेय कवितेकरता मिळालेला ’ना.घ देशपांडे पुरस्कार’ म्हणूनच मोलाचा वाटतो.

या शिवाय कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, नाट्ककार अशा चौफेर यशाबद्दल मिळालेला ’गदिमा प्रतिष्ठान’ चा ’चैत्रबन’ पुरस्कार पाठीवर कौतुकाची थाप देऊन गेला.

’Indian Music Acadmy’ ने ’Outstanding Lyricist of Marathi Music industry in Last 5 Years’ म्हणून माझी केलेली निवड हा सुखद धक्का होता...

या वर्षात काही वेगळ्या धटणीच्या सिनेमांकरता वेगळं काम करायची संधी मिळाली त्यातले अजय अतुलसोबत ‘लयभारी’, अवधूत गुप्तेसोबत ‘एकतारा’, आनंद मोडकांसोबत ‘मालक’, आदेश श्रीवास्तवसोबत ’माया’, कौशल ईनामदारसोबत ’यल्लो’, रवी जाधवचा ’टाईमपास’, गिरीश मोहितेचा ’बाईस्कोप’, ‘Parikrama’ या international band सोबत अकल्पित, निलेश मोहरीरसोबत ‘ढोलताशे’, अपेक्षा दांडेकरसोबत ’अधांतरी’, राहुल जाधवचा ’Hello Nandan’ हे सिनेमे लवकरच म्हणजे २०१४ मधे रसिकांच्या भेटीला येतील.

सिनेमा व्यतिरिक्त काही वेगळे प्रयोगही केले ज्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली ते म्हणजे ..आमच्या ’गुरुयोग म्युझिक कंपनी’तर्फे काव्य रसिकांसठी आणलेली “असे जगावे“ही माझ्या निवडक कवितांच्या काव्य वाचनाची audio सीडी आणि “किणकिण कांकणा तुझी” या मी लिहिलेल्या आणि योगिता चितळे हिने संगीतबद्ध करुन स्वप्निल बांदोडकरसोबत गायलेल्या मालवणी video गीताचं 9x jhakas वर झालेलं आगमन.


एकूणच हे वर्ष कलावंत म्हणून सतत चैतन्य उत्साह सळाळता ठेवणारं ठरलं..म्हणूनच असेल कदाचित त्याला निरोप देताना स्वर जडावतोय..कातर होतोय...!!!


Tuesday, September 17, 2013

Saturday, August 3, 2013

Monday, April 29, 2013

फोकस

' मला कॅमेरा येतो , जसं तुम्हाला गाणं लिहिता येतं . बघा ' कॅमे - याच्या स्क्रीनवर माझा नुकताच क्लिक केलेला फोटो दाखवत तो म्हणाला . फोटो छान आला होता . पस्तिशी ओलांडलेला ' तो ' माझ्या एका मित्राचा आत्तेभाऊ .. त्याचं बूड कुठेच स्थिरावत नाही , म्हणून मित्राने त्याला माझ्याकडे पाठवलेलं . तो मला सांगत होता , ' आजवर तेरा नोकऱ्या बदलल्या , कारण कामासाठी पोषक वातावरण मिळतच नाही . आजूबाजूला तुमच्या उत्तम कामामुळे जळफळाट करणारे सहकारी , तर कधी लायकी नसूनही केवळ वशिल्यामुळे तुमच्या पुढे जाणारे काहीजण , किंवा तुमच्याहूनही कमी आणि अर्धवट ज्ञान असूनही काही मंडळींचा सतत होणारा उदो उदो . अशा विचित्र वातावरणात कसं काम करणार ?.. माझी मुळं त्या वातावरणात रुजायला नकार देतात . म्हणून मी नवीन कुंडी शोधतो .'

' अहो , पण अशा किती कुंड्या बदलणार ..? सारख्या कुंड्या बदलण्याच्या सवयीने तुमची वाढ खुंटते , हे लक्षात येतंय का तुमच्या ?'

' त्याला इलाज नाही हो . तुमचा मागच्या रविवारचा कुठेही रुजणारा पिंपळ मी वाचला . पण तो पिंपळाचा आदर्श मला लागू नाही . माझा आदर्श मी सध्या शोधतोय . त्यासाठी मला मदत करा ..'

' हो , करू काहीतरी ' असं म्हणून मी विषयच बदलला .

त्याच्या हातातला कॅमेरा घेऊन समोरच्या टेबलावरच्या बोनसायचा एक फोटो मी क्लिक केला आणि त्याला दाखवला . ' कसा वाटतोय ?' ' ओह , व्हेरी गुड .. छान व्ह्यू आहे .. बोनसाय , त्या मागचा पडदा , मग खिडकी ..!'

' अहो व्ह्यू नाही , मी त्या बोनसायच्या पानावरची नक्षी टिपायचा प्रयत्न केलाय ..'

' ओह आय सी ! अहो , मग लेन्स चुकली तुमची .. यात ते बोनसाय किती लहान दिसतंय . त्यात त्याची ती अगणित पानं .. तुम्हाला हवं असलेलं पान शोधून त्यावरची नक्षी या फोटोत टिपणं शक्य आहे का ?.. तुम्ही आत्ता जी वापरलीत तिला Wide Angle Lens असं म्हणतात आणि तुम्हाला हवाय तो Micro Mode' असं म्हणून त्याने दुसरी लेन्स सेट केली आणि एक फोटो क्लिक केला . त्याने केलेल्या क्लिकमध्ये नेमकं एकच पान आणि त्यावरची नक्षी इतकंच दिसत होतं . बाकी सगळं आऊट ऑफ फोकस होतं . त्या फोटोकडे पाहून मी त्याला म्हणालो , ' सापडला , तुमचा आदर्श ...!' कॅमेरा बाजूला ठेवून मला म्हणाला , ' कुठाय ? कुठाय ? यू मीन धिस बोनसाय ?'

' नाही , ही लेन्स .. नाही पटत ? बघा , ही बोनसायची पानं म्हणजे ऑफिसमधले तुमच्या कामावर जळफळाट करणारे सहकारी , झाडाचं खोड म्हणजे लायकी नसतानाही तुमच्यापुढे वशिल्याने गेलेली लोकं आणि या पानावरची नक्षी म्हणजे तुम्हाला दिलेली असाइनमेंट !! तुम्ही सतत Wide Angle लेन्स लावल्यामुळे पानावरची नक्षी जशी तुम्हाला मघाशी दिसलीच नाही तसं होऊन जातं . नक्षीऐवजी बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या फ्रेममध्ये येतात आणि ती फ्रेम तुम्हाला नकोशी होते . Micro Mode वापरून पहा . म्हणजे फोकस ऑन युवर असाईनमेंट ... नको असलेल्या सगळ्या गोष्टी आऊट ऑफ फोकस असू देत . पण हा Micro Mode फक्त तुमचं जे ध्येय आहे त्याकरताच वापरायचा आणि प्रॉब्लेम्सकडे बघताना मात्र Wide Angle.. म्हणजे जगभरातले सगळे प्रॉब्लेम्स दिसतील . आणि त्यासमोर आपला प्रॉब्लेम क्षुल्लक ठिपक्यासारखा वाटू लागेल . थोडक्यात योग्य लेन्स सेट होणं महत्वाचं आहे .'

माझं म्हणणं त्याला कितपत पटलं माहीत नाही . पण काल संध्याकाळी माझा फोन वाजला . पलिकडून ' तो ' बोलत होता , ' गुरूजी लेन्स सेट झाली बरं का .. आणि रिझल्ट्स पण हंड्रेड अॅण्ड वन पर्सेंट .. अप्रतिम .. इतकंच सांगायचं होतं ...'

आयुष्याला द्यावे उत्तर ...

संध्याकाळी सहजच चॅनल सर्फिंग करत होतो . डिस्कव्हरी चॅनलवर जीवघेण्या अपघातातून वाचलेल्या नंतर आलेल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून पुन्हा यशाचे शिखर गाठणाऱ्या काही मंडळींवर ती डॉक्युमेंटरी होती ... त्यात काही पाय गमावलेले , हात गमावलेले किंवा अन्य एखादा अवयव गामावलेले , तरीही कृत्रिम अवयव लावून पुन्हा तीच कला सादर करणारेही होते . मग त्यात काही नर्तक होते , चित्रकार होते , मॅरेथॉन धावणारे होते , ते सारं पाहून थक्क झालो आणि त्याचबरोबर माझ्यातला कवी गलबलला ... आणि त्या क्षणी एक कविता कागदावर उतरली . ते शब्द होते ....

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर ...

त्या साऱ्या मंडळींची जिद्द , त्यांचा तो बाणा पाहून ते शब्द आले होते . ती संपूर्ण डॉक्युमेंटरी पाहून होईपर्यंत कविताही पूर्ण झाली होती .

नेमका दोन चार दिवसांनी मला ' इंद्रधनू पुरस्कार ' जाहीर झाला . ठाण्यातल्या एका मोठ्या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक शं . ना . नवरे यांच्या हस्ते तो पुरस्कार मला देण्यात आला . त्या पुरस्काराला उत्तर देताना मी नुकतीच लिहिलेली ती कविता सादर केली . लोकांची छान दाद मिळली . कार्यक्रम संपताच शं . ना . नवरे मंचावर आले आणि मला म्हणाले , ' एक गोष्ट मागितली तर मिळेल का ?' मी म्हटलं , ' बोला काय आज्ञा आहे ?' तर म्हणाले , ' आत्ता जी कविता ऐकवलीत , तीच हवी आहे . काय शब्द लिहीले आहेत हो ! अप्रतिम ! जीवनावर याहून उत्तम भाष्य मी याआधी कधीच ऐकलं नव्हतं .' माझ्याकरता ही मोठी दाद होती . मग लगेच एका कागदावर उतरवून ती त्यांच्या हवाली केली आणि म्हटलं , ' आज पहिल्यांदाच सादर केली ही कविता ...' ते म्हणाले , ' का ? अहो , ही कविता तुम्ही सादर करणं गरजेचं आहे . हे शब्द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे . तेव्हा ही सादर करत चला यापुढे ..'

माझ्या आजवरच्या लोकप्रिय गाण्यांच्या जन्मकथा उलगडणाऱ्या माझ्या ' कसे गीत झाले ' या कार्यक्रमातही ती कविता मी आवर्जून सादर करतो आणि रसिकही या कवितेला भरभरून दाद देतात .

परवाच्या कार्यक्रमात मात्र निवेदिका गायिका योगिता चितळे हिने ठरल्याप्रमाणे त्या कवितेच्या संदर्भातला प्रश्न मला विचारला . कविता सुरू करणार तोच मी गोंधळलो . ' नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ' कसं म्हणू ? कारण कार्यक्रम अंधशाळेत होता . माझ्या प्रत्येक शब्दाला दाद देणारे ते रसिक दृष्टीहीन होते . त्यांच्या भावना दुखावल्या तर ?

मी भलतीच कविता म्हटली . योगिताचा गोंधळ उडाला होता . मी ती कविता विसरतोय , असं वाटून ती दर दोन गाण्यांनंतर त्या कवितेचा विषय काढत होती . अन मी भलतीच कविता म्हणून वेळ मारून नेत होतो . अखेर संधी पाहून मी हळूच तिच्या कानात माझा मुद्दा सांगितला . तिलाही तो पटला . हुशारीने सावरून घेत ती म्हणाली , ' आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे !' इतक्यात एक अंध विद्यार्थिनी उठली आणि तिने फर्माईश केली , ' गुरू ठाकुरांना विनंती आहे की , त्यांनी त्यांची ' नजर रोखूनी नजरेमध्ये ' ही आयुष्यावरची कविता सादर करावी . मला फक्त दोनच ओळी पाठ आहेत . खूप प्रोत्साहन देतात . मला पूर्ण कविता ऐकायची आहे .' माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले . क्षणाचाही अवलंब करता मी सुरुवात केली ...

पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना
संकटासही ठणकावूनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर .........!!

' माणुसकी '

' हे सगळं कशासाठी ?' समोरच्या पेपरवरच्या ' वाघ वाचवा मोहिमे ' च्या पानभर जाहिरातीकडे बोट दाखवत ते म्हणाले. गोव्याच्या विमानतळावर आम्ही दोघेही आपापल्या फ्लाइट्ची वाट पहात होतो. नुकत्याच झालेल्या ओळखीतून इतकंच समजलं होतं , नव्वदीतले ते आजोबा नागपूरच्या वृद्धाश्रमात असलेल्या आपल्या मित्राला भेटायला चालले होते.

' गरज आहे हो , वाघ दुर्मिळ होत चालले आहेत ना ?.. फार गंभीर बाब आहे ही... ' गप्पांना विषय छान आहे म्हणून मी संवाद चालू ठेवला. ' मला वाटतं त्याहून झपाट्याने दुर्मिळ होत चाललेल्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे...पण लक्षात घेतंय कोण ?'
' यू मीन चित्ता ? व्हाइट पिकॉक... '
' माणूस... ' ते म्हणाले.
' गुड जोक... मला वाटतं तो एकच प्राणी जगात झपाट्याने वाढतोय. बाकी सारे दुर्मिळ होतील काही वर्षांनी... '
' नो.. आय एम नॉट जोकिंग... मी
' माणूस म्हणालो.. माणूस '... संख्या वाढतेय ती मानव प्राण्याची... पण ' माणूस ' मात्र दुर्मिळ होत चाललाय... पुरावा हवाय ?' हातातला पेपर माझ्यासमोर धरत म्हणाले.. ' बघा... पाच वर्षांच्या मुलीवरच्या बलात्काराची बातमी होती... बलात्कार , खून , भ्रष्टाचार , बॉम्बस्फोट.... माणूस नाही फक्त प्राणी आहे तो , मानवी रूपातला... '.
मग दुसऱ्या बातमीकडे बोट दाखवत म्हणाले , ' पहा मनुष्यरूपी यंत्र... रस्त्यावर अपघात होतो , बलात्कार होतो , तेव्हा मदतीची भीक मागणारे हात पाहूनही सरळ दुर्लक्ष करून ही यंत्र निघून जातात... जो तो फक्त स्वत:पुरता... स्वत:साठीच. आणि स्वत:भोवतीच फिरणारा... यंत्रमानव.. संवेदनाहीन.. नेमकं काय हरवलंय माहित्ये का ? ... माणूसकी '.
मानवप्राणी + माणूसकी = माणूस... पण ती माणुसकीच मिसिंग आहे.

' वाघ नाहीसे झाले कारण ते जंगलात राहतात... जंगलं संपवली आपणच. मग वाघ संपणारच. पण माणुसकी ? ती जंगलात नाही मानवी वस्त्यात होती. त्या वस्त्या वाढल्या शेकडोपटीने तरीही माणुसकी दुर्मिळ झाली. खरी गंभीर बाब ही आहे. माणुसकी म्हणजे सलोखा , खरेपणा , दुसऱ्याकरता निस्वार्थपणे काहीतरी करायची वृत्ती. विश्वची माझे घर म्हणणाऱ्या माऊलींचा परीघ मोठा होता. तो मग हळूहळू माझा देश , नंतर अनुक्रमे माझं राज्य , माझा गाव असा संकुचित होत गेला. पूर्वी किमान एका गावातला माणूस तरी दुसऱ्याला परका वाटत नव्हता आता एका कुटुंबातलेही परके वाटू लागलेत. स्वत:च्या आईवडिलांसाठी काही करणेही परके वाटणाऱ्या पिढ्या जन्माला आल्यात. अशाप्रकारे माणुसकीचा झपाट्याने आटणारा झरा हा खरा चिंतेचा विषय आहे. हे अधिक वाढलं तर स्वत:च्या स्वार्थापोटी भावनाशून्य झालेली माणसं एकमेकासमोर उभी ठाकतील. तेव्हा विनाश अटळ आहे. त्याआधी माणुसकीचं पुनरुज्जीवन गरजेचं आहे. नव्या पिढ्यांत संस्काराची लस टोचून ते शक्य आहे. कारण ते झालं तर माणूस टिकेल. माणूसपण टिकेल. अणि तो टिकलेला संवेदनशील आणि संस्कारक्षम माणूस जगाचा विनाश होणार नाही याची निश्चितच काळजी घेईल..! '
ते बोलायचे थांबले. वयामुळे की हळवं झाल्यामुळे माहीत नाही पण त्यांचा श्वास भरून आल्यासारखा वाटला.
' माफ करा फार बोललो... पण हा विचार पोचावा असं वाटलं... आमचा आवाज आमच्यापुरताच! तुम्ही कवी आहात. कवितेतून हा विचार मांडलात तर चार लोकांपर्यंत जाईल.. म्हणून सांगितलं '. इतक्यात त्यांच्या फ्लाइटची उद्घोषणा झाली. निरोप घेऊन ते गेले... मी त्यांचे विचार कवितेत मांडू लागलो.
माणसानं माणसांच्या वस्त्या रूजवताना
आटवून टाकल्या नद्या , पेटवून दिली रानं
अन मग फोफावणाऱ्या सिमेंटच्या जंगलात
बसून झोडू लागला परिसंवाद
गेल्या काही वर्षांत झपाट्याने घटत गेलेल्या
वाघांच्या संख्येवर...
पण त्याहून झपाट्यानं घटलेल्या एका गोष्टीचं
त्याला सोयरसुतकही नाहीय 

 माणुसकी ' म्हणत असत तिला
माझ्या माहितीप्रमाणे...
तिचं पुनरुज्जीवन जास्त गरजेचं आहे
कारण ती तगली तर वाघच काय
जगातला कुठलाच प्राणी दुर्मिळ होणार नाही..
अगदी ' माणूस ' देखील

गुरू ठाकूर

Wednesday, January 16, 2013

’देशभक्ती’ची नवी व्याख्या...?????                 

     
सवलतीच्या दराचे सिलेंडर नको असलेल्यांची ’देशभक्त’ ही नवी श्रेणी तयार करण्याचा  प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. ही बातमीच सामान्यांना पेटवणारी आहे. याचा अर्थ सवलतीच्या दरात सिलेंडर घेणारा सामान्य देशद्रोही का??? नाही म्हणजे सवलतीच्या दरात घेणा-यांत घोटाळेबाज भ्रष्टाचारी राजकारणी नेते येत असतील तर ठीक आहे पण अनाथाश्रम,वृद्धाश्रम वा तत्सम संस्थांचे काय? मध्यमवर्ग सोडाच दोन वेळच्या अन्नाला महागलेल्या गरीबांचे काय? हे सारे  देशद्रोही.  आणि  काळाबाजारी, गुंड, अनैतिक मार्गाने बक्कळ कमवणारे, ज्यांच्यावर हजारो खटले दाखल आहेत,ते मात्र  केवळ या एका गोष्टीने देशभक्त ठरणार? आणि ठरवणार कोण?? देशवासियांना देशोधडीला लावायचा विडा उचललेल्यां  या बाजार ना देशभक्तीची लेबलं वाटायचा मक्ता दिला कुणी?????
      आणि खरोखरच पेट्रोलिअम मंत्रालय जर हा प्रस्ताव मांडणार असेल तर घोटाळेबाज भ्रष्टाचा-यांना ठार करुन फासावर जाणा-यांना ’शहीद” दर्जा देऊन मरणोत्तर वीरचक्र देण्याचा प्रस्तावही एखाद्या मंत्रालयाने जनतेतर्फे मांडावा…….पण मांडणार कोण??????

लोकशाहीला लुचती लांडगे
पडे बापडी आजारी
देशभक्तीसही बटकी करुनी
बसवू पाहती बाजारी
माजावरले वळु पोसतो
खंत कुठे ही बोलावी
कणाच पिचता संसाराची
मोट कशी हो ओढावी?
कुणी न वाली सुग्रीव सारे
शोधित फिरती रामाला
लाचारांची लाळ विकाऊ
मोल न उरले घामाला
-    गुरु ठाकूर


"सरकार"म्हणू नको..


"भडवं सरकार ढेकनाच्या बी माथ्यावर लुचतंय राव..पैलं खिसा रापयचं आता पोराबाळांच्या तोंडचा घास वरबाडुन झाला..तरी थांबंना ..रगात बी ठेवीना आंगात..कसं जगावं हो???"
"मणमोहण म्हंतय सुदार्ना पाय्जे तर हे हुनारच..असली उपासानं जीव गेल्यावर सुदारना काय फुली फुलीत घालायची का?"
"सरकारात बी मान्सच अस्त्यात ना रं ? तेना काय मानुसकी असंल का नाइ?..."
"तेनला कुठ दिडक्या मोजाव्या लागतात गड्या..आपल्या बुडाखालचा चटका तेना कुठं कळायला.."
"आस्सं?"
"मंग..गिदाड कवा शिकार कर्ताना पहिलंयस व्हय? ते जगतंय मड्याच्या टाळुवरलं खाउन..त्यातलं हाय ह्ये..तितले वळू कोटींचा चारा खाउन माजताय्त नी आपली गुरं वासरं आचकं देत्यात..ती मेली की दुष्काळ निधीचं सरकारी लोनी झाइर हुइल की पुन्ना गिदाडांचं फावल"
"मायला "सरकार" म्हनलं तरी डोकं सराकतं बग..पैली माजी रुकमी लाडानं म्हनायची मला..पन परवाच्याला सांगुनच टाकलं तिला..वाटलं तर बापावरुन शिवी दे पन "सरकार" नगं म्हनू..!!
      हा संवाद प्रातिनिधिक..पण दर चार दिवसानी भडकत चाललेला महागाईचा आग डोंब.अघोरी होत चाललेली कायदा सुव्यवस्था या सा-याने 'सरकार' नावाचा एक क्रूर जहाल राक्षस आपल्याला पिळुन काढतोय अन आपण त्याच्या विरोधात का्हीच करु शकत नाही ही खंत त्यातुन वाढलेली घुसमट इतकी भयाण आहे की तिला शब्दरुप द्यायचं म्हटलं तर असंच सूचतं..

उगाच मऊ दिसलं म्हणून कोपरानं खणू नको
शिवी दे वाट्टेल ती पण "सरकार" म्हणू नको

चटावलेली जीभ नाही वखवखलेली नजर
अजून रक्तात होतोय माझ्या माणूसकीचा गजर
चुकलो तर धिंड काढ पण "त्यांच्यात" गणू नको
शिवी दे वाट्टेल ती पण "सरकार" म्हणू नको

जमत नसतो शिकून देखील असला निबरपणा
दारीद्र्यात पिचलो तरी जपलाय अजून कणा
दाबून ठेवलंय पोटी ते ऒठी आणू नको
शिवी दे वाट्टेल ती पण "सरकार" म्हणू नको
                                    - गुरु ठाकूर

Friday, October 26, 2012

’देशभक्ती’ची नवी व्याख्या...?????        

     
सवलतीच्या दराचे सिलेंडर नको असलेल्यांची ’देशभक्त’ ही नवी श्रेणी तयार करण्याचा  प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. ही बातमीच सामान्यांना पेटवणारी आहे. याचा अर्थ सवलतीच्या दरात सिलेंडर घेणारा सामान्य देशद्रोही का??? नाही म्हणजे सवलतीच्या दरात घेणा-यांत घोटाळेबाज भ्रष्टाचारी राजकारणी नेते येत असतील तर ठीक आहे पण अनाथाश्रम,वृद्धाश्रम वा तत्सम संस्थांचे काय? मध्यमवर्गाचे राहु द्या दोन वेळच्या अन्नाला महागलेल्या गरीबांचे काय? हे सारेच देशद्रोही का??? आणि काळाबाजारी, गुंड, अनैतिक मार्गाने बक्कळ कमवणारे, ज्यांच्यावर हजारो खटले दाखल करुन आहेत, ते केवळ या एका गोष्टीने देशभक्त ठरणार? आणि ठरवणार कोण?? देशवासियांना देशोधडीला लावायचा विडा उचललेले? या महाभागाना देशभक्तीची लेबलं वाटायचा मक्ता दिला कुणी?????
      आणि खरोखरच पेट्रोलिअम मंत्रालय जर हा प्रस्ताव मांडणार असेल तर घोटाळेबाज भ्रष्टाचा-यांना ठार करुन फासावर जाणा-यांना ’शहीद” दर्जा देऊन मरणोत्तर वीरचक्र देण्याचा प्रस्तावही एखाद्या मंत्रालयाने जनतेतर्फे मांडावा…….पण मांडणार कोण??????

लोकशाहीला लुचती लांडगे
पडे बापडी आजारी
देशभक्तीसही बटकी करुनी
बसवू पाहती बाजारी
माजावरले वळु पोसतो
खंत कुठे ही बोलावी
कणाच पिचता संसाराची
मोट कशी हो ओढावी?
कुणी न वाली सुग्रीव सारे
शोधित फिरती रामाला
लाचारांची लाळ विकाऊ
मोल न उरले घामाला
-    गुरु ठाकूर


Wednesday, August 15, 2012

स्वातंत्र्य दिन म्हणजे काय रे भाऊ???असं म्हणतात की आपल्याला कुणी लुबाडावं? आणि आपण कुणाचे गुलाम असावे? हे ठरवण्याचा हक्क आपण मिळवला, त्या गोष्टीला आज ६५ वर्षे झाली. त्याआधी ब्रिटीश सरकारची सत्ता होती. पण त्यांचा जुलूम फार होता. इथलं लुटून ते तिथल्या राणीच्या खजिन्यात जमा करत असत. आता परिस्थिती बदलली आहे. तो हक्क त्यांच्याकडून आजच्या दिवशी आपण हिरावून घेतला. आता इथे आपल्याच माणसांची सत्ता आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांनी केलेली लूट ते स्वत:च्या खजिन्यात जमा करु शकतात. या देशातले संपले की देशॊदेशीच्या खजिन्यातही ठेवू शकतात. पण सामान्य माणूस म्हणून आपल्याला याचा राग येत नाही. कारण ते परकीय नाहीत. आपलेच आहेत. आपलाच बांधव कुबेर झाला तर दु:ख कसलं करायचं? ब्रिटीशांच्या आधी या देशात राजे राजवाडे संस्थानिकांची सत्ता होती. ती ब्रिटीशांनंतर संपुष्टात आली. स्वातंत्र्यानंतर आपण ती उरलेली संस्थानंही खालसा केली. कारण संस्थानिक कुणी व्हावं? हे ठरवण्याचा अधिकारही स्वातंत्र्यानंतर सामान्य नागरिकाला देण्यात आला. ही खरचं कौतुकाची बाब आहे. दर पाच वर्षांनी मग नवनवे संस्थानिक निवडले गेले, अन त्यांनी स्वत:च्या कर्तबगारीवर स्वत:ची संस्थानं उभी केली. या कामातली त्यांची गती ही खरंच वाखाणण्याजोगी होती. इथले मसाल्याचे पदार्थ, कापूस, सोने अशा व्यापारी गोष्टी देशाबाहेर नेण्यात धन्यता मानणा-या ब्रिटीशांच्या चार पावले पुढे जाऊन यांनी स्वाभिमान, अस्मिता, निष्ठा यांसारख्या किरकोळ फुटकळ गोष्टीही कोट्यावधींच्या भावात विकल्या. तेव्हा खरंच कौतुकाने उर भरुन आला. स्वातंत्र्यपूर्व काळात मोजकेच सम्राट इतिहासाला ज्ञात होते. पण आज साखरसम्राट, शिक्षणसम्राट, मद्यसम्राट अशी सम्राटांची आणि त्यांच्या साम्राज्यांची यादी लिहून त्यांच्या संपत्तीची मोजदाद करायची झाल्यास आभाळाचा कागद अन समुद्राची शाई केली तरी पुरी पडणार नाही. केवढं हे कर्तुत्व! त्यांच्या या साम्राज्य यज्ञात अनेक सर्वसामान्यांची आहूती पडली. पण परकीयांच्या हातून मरण्यापेक्षा स्वकीयांच्या उत्कर्षाकरता मरण येणे कधीही उत्तमच! त्या काळात जमिनी मिळवण्याकरता होणारी हजारोंची कत्तल नवसम्राटांनी थांबवली. मोजक्याच लोकांचा काटा काढून शेकडो एकर भूखंड मिळवण्याच्या त्यांच्या नव्या पद्धतींमुळे शेकडो देशवासीयांचे प्राण वाचले. आपल्या देशबांधवांची ही कर्तबगारी उत्तरोत्तर अशीच झळाळत राहो. याच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा..!!!!!

साठी उलटली स्वातंत्र्याची ग्लोबल झाला देश
छिन्न मुखवटा लोकशाहीचा विस्कटला गणवेष

केवळ टोप्या आणिक झेंडे गहाण डोकी सारी
ठेचुनिया पुरुषार्थ ओणवी अभिलाषेच्या दारी
पोकळ गप्पा बनेल दावे अन बेगडी आवेश
छिन्न मुखवटा लोकशाहीचा विस्कटला गणवेष

देश विकावा कुठे अन कसा केवळ हिशेब चाले
गणतंत्राची माय निजवण्या उत्सुक दलाल सारे
हपापलेल्या नजरा नाही निष्ठेचा लवलेश
गळे मुखवटा लोकशाहीचा विस्कटला गणवेष